सोलापूर – आशिया खंडातील सर्वात मोठा एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प तसेच दहा हजार विडी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी झालेल्या संघर्षाचे प्रतीक म्हणून उभा असलेला कॉ. गोदुताई परुळेकर नगर आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. या वसाहतीतील मलनिस्सारण व सांडपाणी व्यवस्थेसाठी (नगरविकास व ग्रामविकास विभागांतर्गत) ११४ कोटी रुपये तसेच गोदुताई परुळेकर नगर व कॉ. मीनाक्षीताई साने विडी कामगार वसाहतीतील मुख्य अंतर्गत रस्ते बांधणीसाठी (ग्रामसडक योजना/विशेष लेखाशीर्षातून) २७ कोटी रुपये असे एकूण १४१ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.
याबाबत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत, आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोदुताई परुळेकर नगरातील नागरिकांना निधीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. ही माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ नेते, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिली.
राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या घरकुल हस्तांतरण सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात ही मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद यांना प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी हे आदेश स्वतःच्या हस्ताक्षराने दिलेल्या निवेदनावर लिहूनच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त व अन्य अधिकारी उपस्थित होते.
शिष्टमंडळात रे नगर फेडरेशनचे सचिव म. युसुफ म. हनीफ शेख, गोदुताई परुळेकर वसाहतीच्या चेअरपर्सन शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, मीनाक्षीताई साने वसाहतीच्या चेअरपर्सन यशोदा दंडी, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला आदी मान्यवरांचा समावेश होता.