येस न्युज मराठी नेटवर्क ; सिंहगडावर जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची अडचण, गडावर भेट देणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृहासह इतर सुविधांची वानवा असताना महापालिकेने तेथे एक कोटी रुपये खर्च करून ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या आग्रहावरून हा ध्वज उभारण्यात येत आहे.स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ध्वज उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ३० मीटर उंचीचा ध्वज स्तंभ, विद्युत प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक सुशोभीकरणासाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. आमदार तापकीर यांनी केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे रासने यांनी सांगितले.