बार्शी : दिव्यांग निधी मिळावा म्हणून तीन महिन्यांपूर्वी सोलापूरमधील बार्शीतल्या चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या 13 वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे रामचंद्र कुरुळे यांच्या 10 वर्षीय मुलाचा देखील या आंदोलनात मृत्यू झाला आहे. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा झाली असतानाच दोन दिव्यांग मुलांचा निधीसाठी आंदोलन करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिव्यांग बांधावासाठी असलेला निधी मिळाला नाही म्हणून चिखर्डे येथील रामचंद्र कुरुळे आणि त्यांचे कुटुंबीय ऑगस्ट महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. निधी मिळावा म्हणून 18 ऑगस्टपासून गावातच उपोषण सुरु करण्यात आले होते. उपोषणाला गावातील दहा ते पंधरा लोक बसले होते. या आंदोलनात अल्पवयीन मुलगी वैष्णवी कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. मात्र दिवसभर उन्हात बसल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. वैष्णवी हिच्या दुर्दैवी निधनानंतर संबंधितांवर कारवाई करु, तसेच निधी देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर आंदोलन स्थगित करुन कुरुळे कुटुंबियांनी वैष्णवीच्या पार्थिववर अंत्यसंस्कार केले होते.