राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्याला देखील या अवकाळीचा मोठ फटका बसला आहे. या पावसामुळं आठ तालुक्यातील 104 गावांना मोठा फटका बसला आहे. या 104 गावातील सुमारे 3469 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
अवकाळी पावसाचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, आंबा, पपई, ज्वारी, गहू, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हा कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राची पाहणी करुन पंचनामे करण्यास सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.