येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग कमी करण्यासाठी 7 मार्च 2021 पर्यंत जिल्ह्यात रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी करण्याच्या सूचना भरणे यांनी दिल्या. मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दवाखाने, औद्योगिक संस्था, औषधांची दुकाने सुरू राहतील.
ग्रंथालय/अभ्यासिका राहणार सुरू
राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमाचे काटेकोर पालन करून ग्रंथालय/अभ्यासिका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये केवळ 50 टक्केची अट राहणार आहे.
विवाह सोहळ्यांसाठी पूर्वीप्रमाणे नियम
विवाह सोहळे, मंगल कार्यालये सुरू राहतील, मात्र पोलिसांची परवानगी काढावी लागेल. पूर्वीप्रमाणे 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा करता येणार आहे. मास्कचा वापर प्रत्येक ठिकाणी सक्तीचा असणार आहे.
हॉटेल, बार, रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंतच
गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. 11 नंतर सुरू राहणाऱ्या हॉटेल, बारवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.
इतर राज्यातून येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे
सोलापूर जिल्ह्यात इतर राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना उद्यापासून (दि.25) कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.
मंदिरे, पर्यटनस्थळे, क्रीडांगणे राहतील सुरू
मंदिरे, पर्यटनस्थळे, क्रीडांगणे सुरू राहतील. मात्र याठिकाणी शासकीय नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 7 मार्च 2021 पर्यंत मंदिराच्या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच क्रीडांगणे ही केवळ मॉर्निंग वॉकच्या वापरासाठी असणार आहेत. याठिकाणी स्पर्धा, मुलांना खेळण्यास परवानगी नसणार आहे.
साठेबाजांवर होणार कारवाई
लॉकडाऊनचे कारण देत अनेकजण अन्नधान्य आणि इतर वस्तूंचा साठा करीत आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी दिले.
सोलापूरकरांना आवाहन
सोलापूरकरांनो लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियमांचे पालन करा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची काळजी घ्या, मास्कचा वापर करा. सॅनिटायझर, साबणाने हात धुवा, गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन भरणे यांनी केले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव यांनी ग्रामीण भागातील कोरोनाच्या स्थितीचे सादरीकरण केले तर मनपा आयुक्त श्री. शिवशंकर यांनी शहरची स्थिती मांडली.
बैठकीला राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या अधिष्ठाता शुभलक्ष्मी जयस्वाल, लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.