सोलापूर : क्रेडाई सोलापूर तर्फे प्लॉट, फ्लॅटस्, रो हाऊसेज् इत्यादीचे प्रदर्शन यंदा दि. ९ ते १२ डिसेंबर दरम्यान नॉर्थ कोट प्रशाला मैदान येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष शशिकांत जिड्डीमनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. याचे उद्घाटन शुक्रवार दि. ९ डिसेंबर रोजी स. १०.३० वा. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते व स्टेट बँक ऑफ इंडिया चे उप सरव्यवस्थापक महेश्वर प्रसाद, क्षेत्रिय व्यवस्थापक राजीव गुप्ता, तसेच माजी अध्यक्ष किशोर चंडक, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनिल फुरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सोमवार दि. १२ डिसेंबर पर्यंत दररोज स. १० ते रात्रौ ९ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. क्रेडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे एसबीआय होम लोन्स हे बँकींग पार्टनर आहेत. यंदाच्या प्रदर्शनात सुमार ४० स्टॉल्स् असून सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या प्रदर्शनात रविवार दि. ११ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर ही आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली.
क्रेडाई ही सर्व कायदे पाळून ग्राहकांना वेळेत घर देणे व स्वतः वर व्यवसाईक बंधने पाळून कार्य करणारी बांधकाम व्यवसायिकांची राष्ट्रीय संघटना असून क्रेडाई सभासदांकडून याचे काटेकोरपणे पालन केले जाते. ग्राहकांच्या अडी अडचणीही सोडविल्या जातात. क्रेडाई सोलापूर द्वारे रक्तदान शिबीर, कामगारांसाठी विविध शिबीरांसह वृक्षारोपण, सदस्यांसाठी माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन केले जातात अशी माहिती दिली. वुमन्स विंग व युथ विंग – क्रेडाई सोलापूर शाखेतर्फे क्रेडाई सोलापूर वुमन्स विंग व युथ विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग, प्रशिक्षण, शैक्षणिक दौरा, सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. पत्रकार परिषदेस क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभय सुराणा व अभिनव साळुंखे, सचिव आनंद पाटील, सहसचिव सुमित कांकरिया, खजिनदार राजीव दिपाली उपस्थित होते.