बीड – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या बीड स्थित विशेष कोर्टाने या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडला जोरदार झटका दिला आहे. कोर्टाने या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची वाल्मीक कराडची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे या गुन्ह्यातून स्वतःची सुटका करून घेणाऱ्या वाल्मीक कराडचा पाय अधिकच खोलात गेला आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गतवर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा सहकारी वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वाल्मीक कराडने या आरोपाला आव्हान देत आपल्याला दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. पण बीड स्थित विशेष कोर्टाने मंगळवारी त्याची ही याचिका फेटाळून लावली. आजच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली.
सर्वच आरोपींची दोषमुक्त करण्याची मागणी
उज्ज्वल निकम म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातून मला दोषमुक्त करावे अशी मागणी वाल्मीक कराडने एका अर्जाद्वारे केली होती. तो अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला. त्यानंतर विष्णू चाटे व इतर आरोपींनीही आपल्याला या खटल्यातून वगळून दोषमुक्त करावे असा अर्ज दाखल केला. त्यावर मी जोरदार हरकत घेतली. कोर्टाला सांगितले की, ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे. एका आरोपीचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर दुसऱ्याने अर्ज करायचा त्यानंतर तिसऱ्याने करायचा या पद्धतीने वेळेचा अपव्यय करायचा. खटला लांबवत न्यायचा. हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाला सगळ्या आरोपींना एकाचवेळी असा अर्ज करण्याची सूचना करण्याची विनंती केली.
त्यानुसार विष्णू चाटेसह सर्वच आरोपींनी कोर्टात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला आहे. आम्ही या अर्जावर खुलासा दिला आहे. वाल्मीक कराडने कोर्टात जामिनावर सुटका करण्याचा अर्ज दाखल केला आहे. त्यालाही आम्ही विरोध करत आहोत, असे उज्ज्व निकम म्हणाले.
न्यायालयाने कोणत्या पद्धतीने आरोपींवर आरोप दाखल करावे यासाठी आम्ही कोर्टाच्या मदतीसाठी एक ड्राफ्ट चार्ज दाखल केला आहे, अशी माहितीही उज्ज्वल निकम यांनी यावेळी दिली.
वाल्मीक कराडच्या वकिलांनी काय केला होता युक्तिवाद?
वाल्मीक कराडच्या वकिलांनी यापूर्वीच्या सुनावणीत आपल्या अशिलाचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कोणताही हात नसल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते की, प्रस्तुत प्रकरणात 3 वेगवेगळे गुन्हे आहेत. प्रत्येक एफआयआरचे वेगवेगळे आरोपपत्र दाखल झाले पाहिजे. वाल्मीक कराडचा मकोकाशी कोणताही संबंध नाही. त्यांचा गुन्हा व एफआयआर वेगळा आहे. 6 डिसेंबर रोजी वॉचमन सोनवणे यांना मारहाण झाली. या घटनेचा खंडणीशी कोणताही संबंध नाही. या प्रकरणात शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे. त्याच्या जबाबात वाल्मीक कराडचे कुठेही नाव नाही. 15 जानेवारी 2025 रोजी वाल्मीक कराडला हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आले.
प्रस्तुत प्रकरणात अण्णा म्हणजे वाल्मीक कराड हाच आहे असे नाही. संतोष देशमुख यांनाही अण्णा म्हणूनच बोलावले जात होते. पण वाल्मीकलाच अण्णा म्हणून आरोपी करण्यात आले. सीआयडीने मांडलेले मत हे त्यांचे आहे. या प्रकरणी पोलिस तपास गरजेचा होता, असेही ते म्हणाले होते.