सध्या जगभरात जीवघेण्या करोना व्हायरसने अक्षरशा थैमान घातले आहे. सध्या याचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसताना दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार गत 24 तासांत एकट्या अमेरिकेत करोनामुळे तब्बल 1 हजार 920 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जगात करोना बळींच्या संख्येने आता १ लाखाचा टप्पा ओलाडला आहे. चीनमध्ये करोनाची सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अमेरिका हे प्रमुख केंद्र बनले आहे. स्पेनमध्ये ५१० नवीन बळी गेले असून तिसऱ्या दिवशी मृतांच्या संख्येत घट झाली आहे. फ्रान्समध्ये नव्याने एक हजार बळी गेले असून दुसऱ्या दिवशी आयसीयू रुग्णांची संख्या घटली आहे. युरोपात मृतांचा चढता आलेख आता स्थिरतेकडे झुकत आहे. वुहानमध्ये करोनाची साथ सुरू झाल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही देशात एकाच दिवशी एवढे बळी गेले नव्हते. अमेरिकेत करोनाग्रस्तांची संख्या पाच लाखांकडे झुकत चालली आहे.