येस न्युज मराठी नेटवर्क : काही महिन्यापूर्वी करोना विषाणूनं जगभरात थैमान घालण्यास सुरूवात केली. अद्यापही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात कायम आहे. अनेक देश यावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. परंतु अशा परिस्थितीतही चीननं आता भारताबाबत अफवा पसरवण्यास सुरूवात केली आहे. वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यापूर्वी इटलीसोबतच जगाच्या इतर भागात कोरोना विषाणू पसरला असल्याचा दावा चीननं केला होता. परंतु आता कोरोना विषाणू सर्वप्रथम भारतातूच पसरला असा दावा चीनच्या वैज्ञानिकांनी केला. परंतु चीनचा हा दावा काही तज्ज्ञांनी खोडून काढला आहे.
‘चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या वैज्ञानिकांच्या एका टीमनं कोरोना विषाणू २०१९ च्या उन्हाळ्याच्या कालावधीत भारतात निर्माण झाल्याचा दावा केला आहे. तसंच प्राण्यांपासून दुषित पाण्याच्या माध्यमातून या विषाणूनं मानवात प्रवेश केला. परंतु त्यानंतर तो विषाणू वुहानमध्ये पोहोचल्यानंतर करोना विषाणूची पहिल्यांदा ओळख पटवण्यात आली. आपल्या सर्वेक्षणात करोना विषाणूचा स्त्रोत माहित करून घेण्यासाठी चीनच्या टीमनं फिलोजेनेटिक विश्लेषणाचा आधार घेतला आहे.
चीनच्या वैज्ञानिकांनी या पद्धतीचा वापर करून वुहानमध्ये सापडलेला कोरोना विषाणू खरा नसल्याचं म्हटलं. तपासामध्ये हा विषाणू बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, झेक रिपब्लिक, रशिया अथवा सर्बियामध्ये तयार झाल्याचं म्हटलं आहे. तसंच भारत आणि बांगलादेशात कमी म्युटेशनवाले नमूने सापडले आहेत आणि हे देश चीनच्या शेजारी देश आहेत त्यामुळे याचं संक्रमण त्याच ठिकाणाहून झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसंच जुलै किंवा ऑगस्ट २०१९ मध्ये पहिल्यांदा या विषाणूचा प्रसार झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
जनावरांमधून मानवामध्ये करोना विषाणू पसरण्याचं कारण अधिक गरमी हे आहे असा अनुमानही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच भारतातील आरोग्य सेवा आणि तरूणांच्या मोठ्या संख्येमुळे अनेक महिने हा आजार ओळखू न येता असाच पसरत राहिला, असा दावाही चिनी वैज्ञानिकांनी केला आहे. परंतु चिनी वैज्ञानिकांचा हा दावा अन्य वैज्ञानिकांनी खोडून काढला आहे. ब्रिटनमधील ग्लासगो विद्यापीठातील तज्ज्ञ डेव्हिड रॉबर्ट्सन यांनी डेली मेलशी बोलताना चीनचा हा दावा दोषयुक्त असल्याचं म्हटलं. तसंच त्यांच्या दाव्याची खात्रीही नसल्याचंही त्यांनी म्हटलं. यापूर्वी चीननं कोणत्याही प्रकारच्या पुराव्यांशिवाय अन्य देशांवर आरोप केले होते. सध्या जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक करोना विषाणूचा मुख्य स्रोत कोणता आहे याचा तपास करण्यासाठई चीनमध्येही आहे.