येस न्युज मराठी नेटवर्क : देशात एकीकडे करोनावरील लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना दुसरीकडे करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहेत. खासकरून महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तसंच करोना संसर्गाला सहजतेने घेऊ नका, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. महाराष्ट्रातील करोना संसर्गाचे नवीन रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. देशाला करोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल म्हणाले.
महाराष्ट्रातील स्थिती गंभीर होत चालली आहे. करोनाच्या नवीन प्रकारामुळे हा संसर्ग वाढत असल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही. हा प्रादुर्भाव चाचण्यांमध्ये आलेली कमी, बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा आणि त्यांचा शोध घेण्यात येणाऱ्या उणीवामुळे करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, असं आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले.
देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १ लाखाच्यावर गेली आहे. मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरातमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. आम्ही या राज्यांसोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. या सर्व राज्यांनी आता कंबर कसून मैदानात उतरावं, असं आम्ही सांगितलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.