सोलापूर, : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने सर्व शहरांमधून शस्त्रपूजन आणि संचलन काढले जाते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता रा.स्व. संघाने आपला शस्त्रपूजन उत्सव आणि पथसंचलनाचा कार्यक्रम रद्द केला आहे, अशी माहिती सोलापूर शहराचे संघचालक राजेंद्र काटवे आणि जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी यांनी दिली आहे.
यावर्षी कोरोनामुळे एकत्रीकरण करणे सोयीचे नाही. त्यामुळे यावर्षी शस्त्रपूजन उत्सव आणि पथसंचलन न काढता वेगळ्या पद्धतीने विजया दशमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी सर्व शाखांनी अथवा शहरांनी आपला विजया दशमीचा शस्त्रपूजनाचा उत्सव ऑनलाईन साजरा करावयाचा आहे.
नवरात्रीच्या काळात तालुका, शाखेच्या माध्यमातून नऊ दिवस समाज जागरणाचे कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करावेत. यामध्ये बाल, महाविद्यालयीन तरूण, व्यवसायी, प्रौढ, महिला, परिवार अशा वेगवेगळ्या गटासाठी विजयादशमीचा आशय पोहोचविणारे तसेच विविध विषयावर जगजागृतीपर कार्यक्रम आयोजित करावेत. कोरोनाच्या काळात झालेल्या सेवाकार्याची माहिती पुस्तिका मान्यवरांपर्यंत संपर्क करून पोहोचवावी. तसेच विजया दशमीच्या निमित्ताने नागपूर येथे होणारा उत्सव आणि तेथील प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे भाषण सर्व समाजाने परिवारासह ऑनलाईन पहावे यासाठी स्वयंसेवकांनी योजना करावी, तसेच सर्व समाजानेही या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही काटवे आणि कुलकर्णी यांनी केले आहे. तसेच वातावरण सुरळीत झाल्यानंतर पथसंचलनाबाबत स्वतंत्र सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.