राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे धाकधूक वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा अशी सूचना महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सने केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सकडून ही सूचना करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणांवरुन येणाऱ्या व्यक्तीची कोरोना चाचणी करावी अशा सूचना टास्क फोर्सने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने एअरलाईन्ससोबत बोलणी करत चाचणीसंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहे.
सध्या परदेशातून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहेत. यातील पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत.
बीएमसीने प्रतिबंधात्मक उपाययोनांच्या तयारीचा वेग वाढवला
दुसरीकडे मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे. महापालिकेने शहरातील दोन रुग्णालयांसह तीन ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्तशुद्धीकरण केंद्र, शस्त्रक्रियागृह, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग आदी सुविधा या केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.
काही जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट वाढला
राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण 24 डिसेंबरपासून सुरुच आहे. राज्यात दररोज सरासरी 6 हजार 204 चाचण्या केल्या जातात. काही जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. सोलापुरातील पाॅझिटिव्हीटी रेट 20.05 टक्क्यांवर तर सांगलीत पॉझिटिव्हिटी रेट 17.47 टक्क्यांवर आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या 80 टक्के ॲक्टिव्ह रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिकमध्ये आहे.
राज्यात 24 तासात 425 कोरोनाबाधित रुग्णांची भर
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 425, तर मुंबईत 172 कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे 3090 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 937 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागत असून पुण्यामध्ये 726 सक्रिय रुग्ण आढळतात. तर ठाण्यामध्ये 566 सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील रुग्णसंख्येत वाढ
देशभरात सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारांहून जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 हजार 95 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या सहा महिन्यांतील ही रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या आहे. तर चाचण्यांच्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण 1.71 वरुन 1.91 वर गेलं आहे.