नवीन ५१ रुग्ण,३८ कोरोनामुक्त
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराचा covid-19 चा बुधवार दिनांक 19 मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून कोरोनावाढीचा वेग मंदावला आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात नव्याने ५१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून या कालावधीत कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या ३८ आहे . याच कालावधीत ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. शहरातील प्रभागनिहाय बाधित रुग्णांची संख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वाधिक १२ रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल प्रभाग क्रमांक २१ मध्ये ७ व प्रभाग क्रमांक २३ मध्ये ५ रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या ८ व्यक्तींमध्ये २२ वर्षाची महिला आणि ३२ वर्षांची व्यक्ती अशा दोन कमी वयाच्या व्यक्तींचा समावेश आहे. कुमठा नाका परिसरातील २२ वर्षाच्या महिलेचा मृत्यू १७ मे रोजी अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथे झाला आहे. तर दुसरी ३२ वर्षांची व्यक्ती आय. एम. एस. शाळेजवळील राजेश्वरी नगर येथे राहणारी आहे.