येस न्युज मराठी नेटवर्क । सध्या करोना महासाथीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. परंतु सर्वाधिक फटका हा विमान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला बसल्याचं दिसत आहे. क्रेडिट रेटिंग संस्था इक्रा लिमिटेडचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. यानुसार २०२१ या आर्थिक वर्षात विमान क्षेत्राला जवळपास २१ हजार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विमान कंपन्यांना हा तोटा सहन करावा लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.
विमान कंपन्यांना आपल्या तोट्यातून तसंच कर्जातून बाहेर येण्यासाठी २०२१ या आर्थिक वर्षापासून २०२५ या आर्थिक वर्षापर्यंत ३७ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम जाणवणार असल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या संख्येवरही मोठा परिणाम झाला आहे. महासाथीमुळे २३ मार्च नंतर देशांतर्गत सेवांसोबतच आंतरराष्ट्रीय सेवांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. कमी उत्पन्न आणि अधिक खर्च यामुळे विमान क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. परंतु सध्या यामध्ये आता सुधारणा दिसून येत आहेत, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.