येस न्युज मराठी नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून रशिया व युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडीही तीव्र होत होत्या. अमेरिका, ब्रिटेन आदी देशांनी रशियाच्या हल्ल्याची शक्यताही वर्तवली होती. शेवटी ज्याची भीती होती ते रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. रशियाने याआधीच पूर्व युक्रेनमधील ‘डोनेस्तक’ आणि ‘लुहान्स्क’ येथे सैन्य पाठवले होते. यासोबतच रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या स्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात मोठ्या युद्धाची तयारी करत आहे.