येस न्युज मराठी नेटवर्क : “दिल्लीमधील ट्रॅक्टर रॅली बरीच यशस्वी ठरली. जर कोणती घटना घडली आहे, तर त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. कुणी लाल किल्ल्यावर पोहचतं आणि पोलिसांची एक गोळी देखील चालत नाही. हे शेतकरी आंदोलनास बदनाम करण्याचं षडयंत्र होतं. शेतकरी आंदोलन सुरूच राहील.” असं भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.दरम्यान, प्रजासत्ताकदिनी ‘ट्रॅक्टर मोर्चा’ला हिंसक वळण लागल्याने शेतकरी आंदोलनाला तडा गेला आहे. दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असून, शेतकऱ्यांचा १ फेब्रुवारीचा संसदेवरील नियोजित मोर्चाही रद्द करण्यात आलेला आहे.
तसेच, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आता फूट पडल्याचे समोर आलं आहे. भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली आहे.दरम्यान केंद्रीय गृह मंत्री अमित शहा सक्रिय झाले असून मध्यरात्री उत्तरप्रदेशातील बागपात येथे आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी केलेल्या कारवाईत उचलून नेण्यात आले. हरयाणातील कर्नाल येथे लँगर बंद करण्यात आले. आंदोलनाची धार आता कमी होताना दिसत आहे. आंदोलक संघटनांच्या ३७ नेत्यावर २५ गुन्हे दाखल झाले आहेत. ३९४ पोलिस कर्मचारी २६ जानेवारीस झालेल्या हिंसाचारात जखमी झाले. अमित शहा यांनी दुपारी जखमी पोलिसाची भेट घेऊन विचारपूस केली.