येस न्युज मराठी नेटवर्क : औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने ठामपणे विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे राज्यातील आणखी एक प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनीही औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोधच राहील, असे सांगितले. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच या शहराच्या नामांतरावरून वादळ उठलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याबाबत सत्ताधारी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असताना काँग्रेसने मात्र या नामांतरास ठाम विरोध केला आहे. यावरून शुक्रवारी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षांवर टोलेबाजी केली होती. शिवसेना केवळ निवडणुकीपुरता या मुद्द्याचा वापर करत आली आहे. आताही तेच सुरू आहे. आम्ही मागणी करतो आणि तुम्ही विरोध करा, अशा पद्धतीने राज्यात सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांची नुरा कुस्ती चालली आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.