नांदेड : काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रा काल सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ही यात्रा दाखल झाली. देगलूरमधूनच या भारत जोडो यात्रेला आज सकाळी सहा वाजता सुरुवात झाली. पण ही यात्रा अटकळ येथे पोहोचल्यावर दुःखद घटना घडली. नांदेड येथे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात पहिला दिवस आहे. ही यात्रा पुढील चार दिवस नांदेड मधेच असणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर आणि सहकारि यांनी मिळून या यात्रेचे नियोजन केले होते. मात्र या यात्रेत आज दुःखद घटना घडली. राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांनी भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. कृष्णकुमार यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले गेले. पण उपचार सुरू असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले. दुपारच्या कॅम्पमधे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी कृष्णकुमार यांना श्रद्धांजली वाहली.