सोलापूर – सध्याच्या शैक्षणिक वातावरणात जैन गुरुकुलने उत्तम संस्कार करण्याची परंपरा कायम राखली आहे; तसेच दीपक कलढोणे यांनी आपल्या संगीत साधनेतून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविले, शिक्षकाच्या भूमिकेच्या पल्याड जाऊन प्रामाणिकपणे ज्ञानदान करणारा त्यांचा स्वभाव माहित असल्याने त्यांना मी विद्यार्थ्यांचे गुरू असेच म्हणेन. असे सोने क्वचितच संस्थेला लाभते. असे गौरवोद्गार पंडित शौनक अभिषेकी यांनी काढले.
भारतीय शास्त्रीय संगीतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक पंडित शौनक अभिषेकी यांनी वालचंद शिक्षण समूहातील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळीवेस सोलापूर येथे सदिच्छा भेट दिली आणि पं. अभिषेकी परिवाराच्यावतीने पंडित दीपक कलढोणे व मनिषा कलढोणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, नीरज कलढोणे व निरंजनी कलढोणे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे व बालकमंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी गुरुकुल प्रणालीचे प्रणेते परमपूज्य १०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या हस्ते पं.शौनक अभिषेकी यांचा स्वागत-सत्कार करण्यात आला.
पं. कलढोणे यांनी आपल्या मनोगतात अभिषेकी घराण्यातील निर्मोही ज्ञानदानव्रताच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच व्रत येथील कामातही जपल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी “जैन गुरुकुल आपल्या गुणवत्तेची परंपरा सदैव टिकवून ठेवेल.” असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभा सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद खोबरे यांनी केले तर विकास शिळ्ळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी जैन गुरुकुलातील बालक मंदिर,प्राथमिक शाळा,प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.