सरकार पोलिसांचा वापर करुन शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे, असे म्हणत नाना पटोलेंनी सरकारवर घणाघात केला आहे. तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहू, असे देखील ते या वेळी म्हणाले.
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असून आज विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून कांद्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. कांद्याची निर्यात वाढवण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे. कांदा खरेदी सुरु झाली असून जेथे कांदा खरेदी सुरु झालेली नाही तेथे ती सुरू केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली.
आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन केले. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांसह आता आमदार कांदा प्रश्नी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनाच्या कामकाजाची सुरूवात कांद्याच्या प्रश्नावरून झाली. कांद्याच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्री बोलत असताना देखील गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर म्हणाले, शेतक-यांच्या प्रश्नांवर आपल्याला मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं आहे हे ठरवा असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृह शांत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देताना म्हणाले, शेतक-यांचं हे सरकर आहे. म्हणून नियम डावलून भरपाई दिली आहे. नाफेडने खरेदी सुरु केली आहे ज्या ठिकाणी खरेदी सुरु केली नसेल त्या ठिकाणी देखील खरेदी सुरु करण्यात येणार आहे. तसेच निर्यातीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही
छगन भुजबळ म्हणाले, कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. मुख्यमंत्री हे शेतकरी आहेत. ते शेती करतात. तुर्की आणि पाकिस्तान या ठिकाणी मोठया प्रमाणात कांद्याला मागणी आहे. इतर देशांतील व्यापारी आपल्या कांद्याला नकार देतात कारण आपल्या निर्यातीमध्ये सातत्य पाहायला मिळत नाही. आपण लवकर दिल्लीश्वरांशी बोलून यावर तोडगा काढावा. तर अजित पवार म्हणाले, राज्यातील कांदा आणि कापुस उत्पादक शेतकरी बेजार आहे. काल एका शेतक-याने विष घेण्याचा प्रयत्न केला. यावर मार्ग काढला पाहिजे. केंद्र सरकारने याचा विचार केला पाहिजे
सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. कांदा आणि कापूस उत्पादकांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाचया पाय-यावरती आंदोलन केलं. गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झालेले दिसले.