आ. सुभाष देशमुख, पाशा पटेल यांची उपस्थिती
सोलापूर : दक्षिण तालुक्यातील मंद्रुप येथील मळसिद्ध सांस्कृतिक भवन येथे शनिवार, 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता बांबू लागवड मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार पाशा पटेल आणि कोकण बांबू ऊस विकास केंद्राचे संचालक संजय कोरपे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यशाळेत तांत्रिक मार्गदर्शनात माजी आमदार पाशा पटेल हे बांबू लागवडीतून पर्यावरण, तर संजीव करपे हे बांबू व बांबूपासून इमारत बांधणे व फर्निचर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बांबु व्यवसायाचे फायदे या विषयावर शेतकरी मनोगत व्यक्त करतील तर शेवटी शंकेचे निरसन केले जाणार आहे. बांबू लागवडीसमवेत रेशीम लागवड याविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्वाचे घटक आहे. बांबूची शेती, लागवड कशी करावी, बांबू प्रजातीचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटामध्ये दरवर्षी 8 ते 10 नवीन बांबू तयार होत असतात. त्यामुळे बांबू लागवडीचे फायदे याविषयी मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले आहे.