सोलापूर – शहराच्या दृष्टीने समांतर जलवाहिनी महत्वाची आहॆ. लवकरात लवकर त्याचे काम पूर्ण करावे, निधी कमी पडल्यास त्वरित शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करावा आणि येत्या आठ महिन्यात ही योजना पूर्ण करावी अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
आमदार सुभाष देशमुख यांनी बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची विविध कामांबाबत आढावा बैठक घेतली.

या बैठकीला महापालिका आयुक्त शितल तेली उगले, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, विद्या पोळ, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी आरोग्य अभियंता विजय राठोड यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की शहर आणि हद्दवाढ भागात विविध प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे त्यासाठी निधीची कमतरता भासल्यास त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा आपणही त्यासाठी प्रयत्न करू यावेळी महापालिका आयुक्तांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आ.देशमुख यांनी शहरात नाट्यगृह उभारणीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करावा, जुळे सोलापूर परिसरातील राज्य राखीव बल कॅम्प मधील डी.पी रस्त्यासाठी जागेचे संपादन करुन नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करुन देणे, सोलापूर शहर हद्दवाढ भागातील खाजगी नळ आकारणी शुल्क सुविधा नसताना केलेली आकारणी रद्द करणे, विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र सुरू करणे, हद्दवाढ भागातील अमृत-२ योजनेअंतर्गत ड्रेनेज व पाणीपुरवठा संदर्भात प्रारुप आराखडा व अहवाल सादर करावा, सुंदरम नगर येथील स्विमिंग पुल क्रीडा विभागास हस्तांतरण करावा, गणेश बिल्डर्स नं.-३, जुळे सोलापूर येथील मुलभूत सोई सुविधांचा विकास आराखड्यामध्ये समावेश करावा, जुळे सोलापूर परिसरातील पथदिवे दुरूस्ती करावी, सोलापूर शहर हद्दवाढ भागातील जुळे सोलापूर भागात नव्याने बसस्थानक उभारणीसाठी निधी उपलब्ध करणे, हद्दवाढ भागात नविन अंगणवाडया सुरू करणे, कुमठे ते सावतखेड शहर हद्दीतील रस्ता करणे, हद्दवाढ भागात घंटा गाड्यांची संख्या वाढवावी, १४ मोकाट जनावरांना पायबंद घालण्यासाठी गुरेवाहक वाहन सतत कार्यरत ठेवावे,माझे शहर, स्वच्छ शहर यासाठी सामुहिक स्वच्छतेचे आयोजन करावे, हद्दवाढ भागातील बगीचा व क्रीडांगणाचा सुधारणा आराखडा करावा, जुळे सोलापूर भागातील जानकी नगर बागेचे सुशोभिकरण करावे, कंबर तलावामध्ये ड्रेनेज पाणी सोडत असल्याने दुर्गंधी येते, त्यावर उपाययोजना कराव्यात, भारती विद्यापीठ व २२ सोसायटी पाठीमागील मोकळे असलेले व खड्डा असलेली जागा मालकी ही वन खात्याचे असल्याचे समजते याबाबत खात्री होऊन त्याची माहिती मिळावी व तेथील अतिक्रमण बाबत पाठपुरावा करणे व त्याठिकाणी नियोजित ग्राउंड व गार्डन चा प्रस्ताव टाकावा आदी मागण्या करत त्याची लवकर पूर्तता करावी अशा सूचना यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी केल्या.