येस न्युज मराठी नेटवर्क : पुण्यातील कोरोनाची स्थिती भीषण असून गर्दी कमी करण्यासाठी संचारबंदी आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाने कंबर कसली असून वीकेंड लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. मुख्यत्वे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडत असल्याने ही सेवाच बंद करण्यात आली आहे. वीकेंड लॉकडाऊनला दोन्ही दिवस जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने करोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे सकाळी सात वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यासोबत कठोर निर्बंधही लादण्यात आले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याने त्याच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. संचारबंदी असूनही अनेक शहरांत गर्दी कमी होवू शकलेली नाही. ही बाब गांभीर्याने घेत सरकारकडून कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याचवेळी पुण्यात आज प्रत्यक्ष कडक लॉकडाऊन पाहायला मिळाला. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांपैकी फक्त औषध दुकाने सुरू ठेवत बाकी सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. याबाबत पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी माहिती दिली.