सोलापूर : लग्न होऊन अवघे आठ दिवस झाल्यानंतर पतीने श्रद्धा पाटील या विवाहितेस तू एका पायाने लंगडी आहेस , तू आम्हाला पसंत नाही, लग्नामध्ये आमचा मानपान झाला नाही, असे सांगून अपमानित करून घराबाहेर काढल्याने सासू-सासरे आणि पतीविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सैफुल येथील कांचनगंगा नगर येथे राहणाऱ्या श्रद्धा पाटील या विवाहितेने पाच जुलै रोजी फिर्याद दीली असून 1 जून 2014 ते 14 मार्च 2021 पर्यंत सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. श्रद्धा पाटील हीची सासू तुलसी पाटील, सासरे मल्लिनाथ पाटील आणि पती संजय पाटील या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार शेख अधिक तपास करीत आहेत.
उसने पैसे परत मागितल्याने डोक्यात दगड घातला
सोलापूर : भावाने घेतलेली चारशे रुपये परत देण्याची मागणी केली असता राहुल मंजुळे याने रस्त्यावरील दगड उचलून बाबू मुंगली याच्या डोक्यात मारला. तसेच शिवीगाळ केल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास चालू आहे. हा प्रकार छान जुलै रोजी बापूजीनगर येथे झाला आहे.
घराचे कुलूप तोडून दोन लाखांचा ऐवज लंपास
शेळगी : येथील संतोषी माता नगर येथे राहणाऱ्या सतीश बजरंग डोके स्वतःच्या घराला कुलूप लावून शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये झोपायला गेले असता दोन लाखांची चोरी झाली आहे. घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने कशाने तरी तोडून बेडरुममध्ये ठेवलेल्या कपाटातील सोन्याचे गंठण, बोरमाळ , कर्णफुले, सोन्याची पीळाची अंगठी, सोन्याचे दोन बदाम, चांदीचा करंडा तसेच ८० हजार रुपये रोख असा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे . याप्रकरणी सतीश डोके यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर दाईंगडे अधिक तपास करीत आहेत.