आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सहाय्यकांच्या संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेत मार्गदर्शन.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रामीण जनतेशी सुसंवाद वाढण्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली *सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक आणि आरोग्य सहाय्यक यांची *संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत विविध व्याख्यात्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. धन्वंतरी पूजनानंतर धन्वंतरी स्तवनाचे गायन करण्यात आले. गटप्रवर्तक रंजना सपकाळ यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यशाळेस सुरूवात करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सीईओ स्वामी म्हणाले की या उपक्रमासाठी शासनस्तरावरून किंवा वरिष्ठस्तरावरून आदेश नाहीत तर आपल्या जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार व्हावी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंवाद वाढावा यासाठी एक प्रयत्न म्हणून हा प्रपंच. आरोग्य सेवा देताना रुग्णांच्या भावनांना प्रतिसाद द्या , त्यांचे ऐकून घ्या. ग्रामस्थ आणि तुमच्यातील सुसंवाद वाढला तर विश्वास निर्माण होईल. आपले शासकीय कर्तव्य पार पाडताना स्वतःकडे व स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सशक्त शरीरात एक सशक्त मन राहतं आणि सशक्त मनाने तुम्ही येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाल. जनतेबरोबरच आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही सुसंवाद वाढावा. आरोग्य सेवेविषयी ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्यातील बहुतेक तक्रारी विसंवादामुळेच निर्माण झाल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. जे आवश्यक आहे तेवढंच बोला, बोलण्याची पद्धत साधी व सौम्य ठेवा.
येणाऱ्या आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांना आरोग्य सेवा देताना विठ्ठलाची सेवा करण्याचे भाग्य आपणांस मिळाले आहे या भावनेतून काम करा या कडे काम म्हणून न पाहता सेवा म्हणून पहा. स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी काम करत रहा म्हणजे कामाचे ओझे वाटणार नाही.
संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास या विषयावर बोलताना व्याख्याते जिवराज खोबरे म्हणाले की आरोग्य सहाय्यकांचे जॉब चार्ट पाहिला तर असे जाणवले की समाजात या संवर्गाला फार मोठी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. विविध जाती-धर्म, मानसिकता, डोक्यात ना ना समज गैरसमज, श्रद्धा-अंधश्रद्धा डोक्यात घेऊन आलेल्या मंडळींना तुम्हाला सामोरे जावे लागते. या सर्वांशी सुसंवाद साधनं म्हणजे दिव्य आहे. यासाठी ध्यानधारणा व व्यायामाकडे लक्ष द्या. यासाठी स्वतःशीच अगोदर संवाद साधा. स्वतःशी संवाद साधता आला तरच तुम्ही इतरांशी संवाद साधू शकता.
यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे म्हणाल्या की आरोग्य सहाय्यकांचे महत्वाचे काम म्हणजे उपकेंद्र स्तरावरील आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात दुवा साधने. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना समजून घेवून त्यांना आरोग्य सेवेविषयी मार्गदर्शन करा. महत्वाचे म्हणजे मुलींच्या जन्माचा टक्का न वाढण्यामागे लोकांशी संवाद साधण्यात आपण कमी पडतो हेच कारण आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील यांनी स्री भ्रुण प्रतिबंधक कायदा यावर मार्गदर्शन केले.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ पाटणकर यांचे ताणतणाव मुक्ती व आरोग्य रक्षण यावर मार्गदर्शन झाले.
सहा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीकांत कुलकर्णी यांचे महत्वाच्या योजना व अंमलबजावणी यावर मार्गदर्शन झाले.
साथरोग विज्ञान व उद्रेक या विषयावर डॉ बिरुदेव दुधभाते सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षमीकरण, सादरीकरण व बौद्धिक खेळ यावर जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ विलास सरवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. संगीता सोनवणे यांनी मानले.
यावेळी सहाय्यक संचालक कृष्ठरोग डॉ मोहन शेगर व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.