नंदूर येथील शेतकरी मेळाव्यात दिली ग्वाही
आवताडे शुगर ॲण्ड डिस्टिलरीज प्रा. लि. प्रकल्पाचा प्रथम गळीत हंगाम शुभारंभ संपन्न
पंढरपूर : आपले सरकार शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेणारे सरकार आहे. असे अजून खूप निर्णय घ्यायचे आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करायचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
नंदूर ता. मंगळवेढा येथे आवताडे शुगर ॲण्ड डिस्टिलरीज प्रा. लि. प्रकल्पाच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत, राम सातपुते, गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, हर्षवर्धन पाटील, चेअरमन संजय आवताडे आदि उपस्थित होते.
सरकार आल्याबरोबर शेतकऱ्यांना ७ हजार कोटी रुपये दिले. पाऊस, पूर, पडझड अशा नैसर्गिक आपत्तीत निधी दिला. ऐतिहासिक ६५ मि. मी. पावसाची अट न ठेवता मदत केली. एनडीआरएफच्या दुप्पट मदत दिली. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुजरातच्या राज्यपालांच्या उपस्थितीत मागील काळात १० हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले. खतांचे भाव, फवारणी भाव वाढले. उत्पादन खर्च वाढला. त्यामुळे नैसर्गिक शेतीतून उत्पादन घेण्यास सुरवात केली. शेतकरी शास्त्रीय पद्धतीने नैसर्गिक शेती करत आहेत. शेतकरी आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या शेतामध्येच तयार करेल. काही विकत आणावे लागणार नाही. उत्पादन वाढेल. आगामी काळात नैसर्गिक शेती मोहीम स्तरावर राबवण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या ५ ते ६ वर्षात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आज ऊस कारखानदारी जिवंत आहे. आपण मुख्यमंत्री असताना २ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यानंतर केंद्राने दिले. या माध्यमातून साखर कारखानदारीला जिवंत ठेवण्याचे काम करण्यात आले. एफआरपी चे भाव गेल्या ८ ते ९ वर्षात जवळपास आठशे ते एक हजार रूपयांनी वाढले. कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी सक्षम केलं पाहिजे, त्यासाठी किमान आधारभूत किंमतीचा शासन निर्णय अंमलात आणला, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साखरेच्या भावावर नियंत्रण एकटा भारत ठेवू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझील मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन करतो, त्यामुळे आमच्या साखरेला भाव मिळू शकत नाही. साखर कारखानदारी वाचविण्यासाठी उपपदार्थ निर्मितीवर भर दिला. इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून आमच्या उद्योगांची, कारखान्यांची, वाहनांची भूक शेतकरी भागवेल. अशा प्रकारची व्यवस्था प्रधानमंत्री मोदींनी निर्माण केली. इथेनॉलचे दर सातत्याने वाढवत नेले. यामुळे संपूर्ण कारखादारीला स्थिरता मिळाली आहे. निर्यातीबाबतचे नियम, अनुदान, अन्य मदत, कर्जाचे पुनर्वसन अशे अनेक निर्णय केंद्राने घेतले, असे त्यांनी सांगितले.
२४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला गती दिल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक, संत चोखामेळा स्मारक प्रश्न मार्गी लावू. फलटण - पंढरपूर रेल्वेसाठी राज्याचा वाटा देण्याचे पत्र केंद्राला पाठवू, असे ते म्हणाले.
पांडुंरग हा सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकऱ्यांचा देव आहे. शेतकरी, कष्टकरी सुजलाम सुफलाम झाले पाहिजेत. त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी पांडुरंगाने आम्हाला शक्ती द्यावी, असे साकडे आज पांडुरंग चरणी घातल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार समाधान आवताडे यांनी अडचणींवर मात करून कारखाना सुरू केला. या माध्यमातून शेतकरी व कामगारांचा फायदा होणार आहे. अर्थतंत्राचे चक्र सुरू राहते. सामान्य माणसाचे, शेतमजुराचे दिवस बदलतात. येत्या काळात शेतकऱ्यांची सेवा करण्याचे काम या कारखान्याच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. साखर कारखाने चालवणे कष्टप्रद काम असल्याचे सांगून त्यासाठी उपमुख्यमंत्री व आमदार समाधान आवताडे यांचे त्यांनी अभिनंदन केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. साखर विक्रीचे दर गेल्या काही वर्षात निश्चित केले. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देता येणे शक्य झाले. केंद्र शासनाने इथेनॉल धोरण आणले म्हणून देशातील, राज्यातील साखर कारखानी टिकली.
प्रास्ताविकात आमदार समाधान आवताडे यांनी स्थानिक प्रश्न मांडले. कारखाना बॉयलर अग्नीप्रदीपन करून मान्यवरांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली. आभार ॲड. बाबूसाहेब पेटकर यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.