मुंबई : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केल्यानंतर अखेर कलर्स टीव्हीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना आणि मनसेने दिला होता.
यानंतर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागितली आहे. पत्रात म्हटलं आहे की, कालच्या भागात मराठी भाषेविषयी जो वादग्रस्त भाग प्रसारित झाला तो आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकत आहोत. महाराष्ट्रातील जनतेची माफी मागत वाहिनीने पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील प्रेक्षक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळं आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो, असं पत्रात म्हटलं आहे.