भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सोलापूर, पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषि, प्रक्रिया उद्योग अशा सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे आदिंसह विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्राणांची आहुती दिलेल्या क्रांतिकारकांच्या त्यागापासून स्फूर्ती व प्रेरणा घ्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात प्रारंभी स्वतंत्र भारतासाठी बलिदान दिलेले ज्ञात-अज्ञात शहिदांना अभिवादन केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, पालकमंत्री महोदयांच्या व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या शाश्वत विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. 2023-24 साठी जिल्हा वार्षिक योजनेतून 658.23 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा प्रस्तावित केला आहे. या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थी, तज्ज्ञ यांच्याशी समन्वय ठेवून सोलापूर जिल्ह्याचा सर्वंकष विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात मुबलक पाणी उपलब्ध होऊन सिंचन क्षमता वाढेल, यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. अमृत सरोवर अभियानातून 164 पैकी 108 कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान 1.0 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील 933 गावांमध्ये विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियान 2.0 च्या पहिल्या टप्प्यात 232 गावे जलयुक्त करण्याचे नियोजन आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत सुमारे 26 गावांमध्ये 36 हजार हेक्टर क्षेत्र अंतर्गत 32 कोटी रूपयांची पाणलोट विकासाची कामे प्रस्तावित घेण्यात आली आहेत, असे सांगून त्यांनी यावेळी चला जाणूया नदीला अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
चौपदरी महामार्गांचे जाळे निर्माण झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सूरत चेन्नई महामार्गासाठी वेळेत भूसंपादन पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. हा मार्ग सुरू झाल्यावर जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, कुंभारी येथील असंघटित कामगारांसाठीच्या 30 हजार घरांच्या प्रकल्पांतर्गत कामांचा, स्मार्ट सिटी योजनेत महानगरपालिकेतर्फे झालेल्या कामांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेने महाआवास अभियानामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल तसेच, आरोग्य विभागाने माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान यशस्वीपणे राबवल्याबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले.
लोकाभिमुख प्रशासनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पालकमंत्री संपर्क कार्यालय यांची माहिती देऊन सेवा पंधरवड्यामध्ये केलेल्या कार्यवाहीचा आढावा शंभरकर यांनी यावेळी घेतला. तसेच, महसूल भवन इमारत, ई ऑफिस प्रणाली, पोलीस विभाग पदभरती, भूमि अभिलेख विभागाने खरेदी केलेल्या रोव्हर मशीन यामुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रारंभी भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, गृहरक्षक दल, पोलीस विभाग महिला व पुरूष पथक, शहर वाहतूक शाखा, एनसीसी पथक, सोलापूर शहर वाद्यवृंद पथक, तसेच विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच, श्वान पथक, फॉरेन्सिक सायन्स व्हॅन, बीडीडीएस, महारक्षक, वज्र वाहन, वरूण वाहन, वन, आरोग्य, कृषि, महिला व बालकल्याण विभाग, अग्निशमन, परिवहनाची वाहने, रूग्णवाहिका, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सुरक्षा कवच, मतदार जनजागृती रथ यांनीही या संचलनात सहभाग नोंदवला. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थितांची भेट घेऊन नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गृहरक्षक दलातील गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदक प्राप्त एकनाथ सुतार तसेच, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत आर्चरी खेळामध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल महिला पोलीस नाईक अश्विनी गाजरे यांना सन्मानित करण्यात आले. पोलीस दलात विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारार्थी, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी, जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कारार्थी, उत्कृष्ट सेवा पुरविणारी रूग्णालये, शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल मलकप्पा बणजगोळे यांनी केले.