राज्यातील महापालिका निवडणुकीत एकत्र लढून ही दारुण पराभवाला सामोरे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्नाटा पसरला आहे. परंतु यावर मात करत दोन्ही राष्ट्रवादींमध्ये दुसऱ्याच दिवशी हालचालीला वेग आला. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंद बाग येथील निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात एकत्रितपणे लढण्याबाबत यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, आमदार रोहित पवार आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

