येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. जामिनाची स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयला मुदतवाढ देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. सीबीआयची विनंती सुटीकालीन उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे अनिल देशमुखांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांची १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांनी आर्थररोड तुरुंगातून सुटका होणार आहे. अनिल देशमुख हे उद्या तुरुंगातून बाहेर येतील, अशी शक्यता आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळूनही तो आदेश स्थगित असल्याने अद्याप तुरुंगातून सुटका न झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंग मुक्काम २७ डिसेंबरपर्यंत वाढला होता. कारण जामिनाला स्थगिती देणाऱ्या आपल्या आदेशाची मुदत उच्च न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीवरून वाढवली होती. अनिल देशमुखांना दिलासा मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर जल्लोष सुरू केला आहे. देशमुखांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे.