मुंबई : सीआयडी या लोकप्रिय मालिकेतील इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
सीआयडी या मालिकेत दयाच्या भूमिकेत दिसणारे आणि दिनेश फडणीस यांचे खास मित्र दयानंद शेट्टी बोलताना म्हणाले,”लीवर, हृदय आणि किडनीसंबंधित समस्यांचा दिनेश यांना सामना करावा लागत होता. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. 30 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते”. दिनेश फडणीस यांच्या पार्थिवावर बोरिवलीतील दौलत नगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिनेश यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांसह सिनेमातदेखील काम केलं आहे. दिनेश फडणीस सीआयडीच्या सुरुवातीपासूनच या कार्यक्रमासोबत जोडले गेले आङेत. सीआयडीच्या दोन दशकांच्या प्रवासात त्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.
दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती दयानंद शेट्टी यांनी दिली होती. अशातच आता त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.