१२ ते १७ वयोगटातील मुलांना ऑक्टोबरपासून मिळणार लस
नवी दिल्ली : देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून करोना लस मिळणार आहे. देशात या वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाईल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे. सरकारच्या कोविड१९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एन . के. अरोरा यांनी सांगितले कि, भारतात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले आहेत, त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा विषाणूमुळे मृत्यू होण्याच शक्यता नाही. उलट, त्यांच्या पालकांमध्ये १० ते १५ पटीने आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याची शक्यता असू शकते जे साधारणतः १८ ते ४५ वयोगटातील आहेत. म्हणूनच, आम्ही मुलांना लसीकरण सुरू करण्यापूर्वी या (१८ ते ४५) गटाचे लसीकरण करण्यास प्राध्यान्य देत आहोत.
शाळा सुरु करणे अत्यंत आवश्यक
डॉ. अरोरा म्हणाले की, देशात १८ वर्षांखालील सुमारे ४४ कोटी मुलं आहेत. मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शाळा पुन्हा सुरू करण अत्यंत आवश्यक आहे. मुलं शाळेत जाऊ शकतात. लसीकरणाची गरज नाही. पण ती सुरक्षित असायला हवी. त्यांच्या आजूबाजूला सुरक्षेची एक ढाल तयार करणं आवश्यक आहे. म्हणूनच त्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी याचं लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री करायला हवी.