सोलापूर : मोहोळ तालुक्यातील मौजे खंडाली येथे होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. एका 31 वर्षीय तरूणाचा विवाह 16 वर्षीय अल्पवयीन बालिका (रा. मौजे येवती ता. मोहोळ) हिच्यासोबत होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांना भ्रमणध्वनीद्वारे मिळाली. त्यानुसार श्री. वाघमारे यांनी जिल्हास्तरावरून सर्व सूत्रे हलवत होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात यश मिळवले.
सदर बालविवाह रोखण्याकामी मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुसया बंडगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, संरक्षण अधिकारी उज्ज्वला कापसे, चाईल्ड लाईनचे योगेश स्वामी यांचे पथक तयार करण्यात आले. सदर पथक विवाह स्थळी नवऱ्या मुलाच्या घरी पोचले असता घरासमोर लग्न मंडप घातलेला दिसून आला. त्याचं लग्न मंडपात पिवळी साडी घातलेली हळदीचा विधी पूर्ण केलेली बालिका बसल्याचे आढळले. पथकाने चौकशी केली असता त्या बालिकेचे वय 16 वर्षे असल्याचे आढळले. त्यामुळे पोलीस पथकाने बालिकेस ताब्यात घेतले. बालिकेचा जबाब नोंदवून सदर बालिकेला बालकल्याण समिती सोलापूर यांच्या समक्ष हजर केले असून समितीने बालिकेस बालगृहात दाखल करून घेतले आहे.
सदर बालविवाह रोखण्याची यशस्वी कार्यवाही जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.