सोलापूर – “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची” जिल्हास्तरावरुन अभियानाचे चित्ररथाने सुरुवात केलेली असूनसदरचे चित्ररथ हे सर्व तालुक्यात अभियानाची प्रचार – प्रसिध्दी करणार आहे. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम शुभारंभ अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रामस्थांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले व यावेळी लोकसहभातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले, तसेच जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ व इतर कार्यालयीन पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दक्षिण तालुक्यातील हत्तूर येथे आ. सुभाष बापू देशमुख तसेच पंढरपूर तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायत येथे आ. अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्दिष्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामविकासाची लोकचळवळ निर्माण करणे, ग्रामपंचायतींना सक्षम व पारदर्शक बनवून जलसमृद्ध, स्वच्छ, हरित व सुशासनयुक्त पंचायत तयार करणे यावर भर देणे आवश्यक आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकचळवळ तयार होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या निमित्ताने गावे स्वच्छ हरित व समृद्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. तसेच राज्यातील सर्व गावे मॉडेल गावे करायची आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बोलताना म्हणाले की आजवरच्या सर्व उपक्रमांमध्ये हा उपक्रम वेगळा असून लाखो करोडो रुपयांचे बक्षिसे आपण चांगले काम करणाऱ्या संस्थांसाठी देण्याची तरतूद केलेली आहे. या निमित्ताने ग्रामविकासाला उभारी मिळून स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडताना सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपातळीवर सामाजिक न्याय, मनरेगा व उपजीविका विकास या क्षेत्रातील कामांना गती मिळेल, तसेच लोकसहभागातून योजनांचे अभिसरण सुलभ होईल. आपला सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अति मुख्य कार्यकारी अधिकारी. संदीप कोहिणकर यांनी करमाळा तालुक्यातील ग्रा. सालसे व केम गावाला भेटी दिल्या , तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशा) सांगोला तालुक्यातील चिणके गावाला भेटी दिल्या व अभियाना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषद कडील सर्व विभागप्रमुख यांनी तालुक्यातील गावाला भेटी दिल्या. तालुका स्तरावर प्रत्येक ग्रा प करिता नोडल अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व 1024 ग्रा प ठिकाणी ग्रामसभा अत्यंत उत्साहात घेण्यात आल्या. यासाठी सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
जिल्हयाचा मुख्य कार्यक्रम अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे व शिरवळ ग्रामपंचायत येथे पार पडला यावेळी आमदार सचिन कल्याणशेटृटी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिरवळ गावाला उत्तम परंपरा आहे आणि या अभियानाचा मूर्तमेढ येथे रोवला जात आहे, त्यामुळे संपूर्ण ग्रामविकासाचा सकारात्मक परिणाम होईल .तहसीलदार विनायक मगर, गट विकास अधिकारी शंकर कवितके, यांनी या अभियानाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.
सोलापूर जिल्ह्यात 1024 ग्रामपंचायतीमध्ये या अभियानाची सुरुवात करणेपुर्वी सदर ग्रामसभेची नोंद पंचायत निर्णय ॲप वर करुन आज झालेल्या ग्रामसभचे सर्व माहिती व फोटो अपलोड करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात विविध कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिलांचे सहभागी झाले होते. या अभियानाद्वारे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामस्थ जीवनमान उंचावण्याचा, जलसंपत्ती संवर्धन करण्याचा आणि स्वच्छता व हरितता सुनिश्चित करण्याचा निर्धार केला.



उद्दिष्टे :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामस्तरीय संस्थांना सक्षम बनवून विकासात्मक, पारदर्शक आणि सुशासनयुक्त पद्धतीने कार्यान्वित करणे आहे. विशेषतः या अभियानाद्वारे पुढील मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे.
ग्रामपंचायतींना सक्षम करणे, जलसंपत्ती संवर्धन व जलसंपन्न ग्राम निर्माण करणे, स्वच्छता व हरितता सुनिश्चित करणे
सामाजिक न्याय व उपजीविका विकास साधणे, मनरेगा व इतर योजना योग्य प्रकारे अभिसरण करणे, ग्रामपातळीवर लोकसहभागाची चळवळ उभारणे.
आगामी कार्ययोजना :
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले की, “आम्ही तालुक्यातील प्रत्येक गावात समृद्ध पंचायतराज अभियानाचे प्रभावी अंमलबजावणी करणार आहोत. ग्रामविकासाचे अभिसरण, योजनांचे प्रभावी उपयोग व ग्रामस्थांच्या सहभागातून हरित, स्वच्छ व जलसमृद्ध ग्रामनिर्मितीची दिशा सुनिश्चित करणार आहे.