मुंबई : महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय सत्तांतरणानंतर अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. शिंदे घराण्यातला पहिला माणूस आज मुख्यमंत्री विराजमान होत असल्याने एकूणच आनंदाचे वातावरण होते. यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित होते.
खेळी मेळी आणि आनंदाच्या वातावरणात हा पदभार सोहळा पार पडला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळ खुर्ची घेऊन मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसले. काहीवेळ गप्पा, विनोद करत उपमुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे यांना हस्तांदोलन करत सर्वांना पुन्हा नमस्कार केला. यावेळी शिंदे कुटुंबिय आणि शिंदे समर्थक आमदारांनी देखील उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून निरोप दिला.
शिंदे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भव्यदिव्य कार्यालयात पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण कार्यालय आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नव्या चेंबरमध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आले असून त्याशेजारी शिंदे यांचे गुरू आनंद दिघे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही फोटो लावला आहे.