सोलापूर : महाराष्ट्रात रामराज्य यावे याकरिता शहर मध्य विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रीरामचंद्र, श्री लक्ष्मण, श्री सीतामाई आणि श्री हनुमंताची मूर्ती असलेली ‘राम दरबार’ ची प्रतिकृती देऊन सन्मान केला. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मुंबई येथे अभिनंदन केले.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, रामराज्य आणि शिवराज्य म्हणजे जनहिताचे राज्य होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कणखर नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा रथ अधिक गतिमान होईल, याची सर्वांनाच खात्री आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेला मनस्वी आनंद झालेला आहे. आगामी काळात सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.
हनुमंताप्रमाणे सेवक म्हणून राहणार कार्यरत : आ. देवेंद्र कोठे
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात रामराज्य येत असताना मी हनुमंताप्रमाणे सेवक म्हणून कार्यरत राहून सोलापूरचा विकास साधेन”, असा शब्द याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतातून दिला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठीवर थाप मारून त्यांचे कौतुक केले.