येस न्युज मराठी नेटवर्क : मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नियतीने, जनतेने हे स्पप्न पूर्ण केलं आहे. मंत्रालयावर भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते त्याचा उल्लेखही कायम करत. यावर्षी ते स्वप्न पूर्ण झालं आहे. त्यामुळे यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होणं, स्मरण होणं हे वेगळ्या दृष्टीने महत्वाचं आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने अनेक नेत्यांनी मुंबई येथील त्यांच्या स्मृती स्थळी जाऊन अभिवादन केलं. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावेळचा स्मृतीदिन खऱ्या अर्थाने वेगळा आहे कारण मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचं बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
मी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आलो आहे. मी दरवर्षी या ठिकाणी येतो. पण यावेळी बाळासाहेबांचं मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. नियतीने आणि जनतेने हे स्वप्न पूर्ण केलं आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. आम्हाला सगळ्यांनाच महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जी जबाबदारी नियतीने आमच्या खांद्यांवर टाकली आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत. बाळासाहेबांचं स्वप्न केवळ भगवा फडकवणं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री करणं एवढंच नव्हतं तर महाराष्ट्राचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढे पडलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.