जालना: राज्यातील 2020-21 च्या ऊसाचा गळित हंगाम एप्रिल महिन्यात संपला. राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकवल्याचे समोर आले आहे . तर, काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलापोटी दिलेले चेक वटले नसल्याचे समोर आले आहे . विविध जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाची बिलं न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
ऊसाचं बील न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा ऊस सोलापूर जिल्ह्यातील इंद्रेश्वर शुगर्स, लातूर जिल्ह्यातील श्री साईबाबा शुगर्स शिवणी व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील सचिन घायाळ शुगर या साखर कारखान्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांची कोटींची देणी थकविली आहेत. विशेष बाब म्हणजे श्री साईबाबा शुगर्स या कारखान्याने शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात दिलेले धनादेश खात्यावर रक्कम नसल्याने वटले नाहीत. या सर्वच कारखान्यांची जानेवारी ते एप्रिल 2021 पर्यंतची ही देणी थकीत आहेत. ऊसाचे बिल वेळेवर मिळत नसल्याचे ऊस उत्पादक शेतकरी सुभाष रोटे, नारायण आमटे यांनी संताप व्यक्त केला आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ही ऊस बिलाची थकीत देणी न दिल्यास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक सह संचालक कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना जालनाचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी ही माहिती दिली.