येस न्युज मराठी नेटवर्क : नेत्यांची व्याख्या ही ‘वाहून नेणे’ अशी होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणतेही प्रश्न सोडविण्याची गरज भासत नाही. ठाकरे हे पक्ष चालविण्यासाठी जन्माला आले आहेत; राज्य चालविण्यासाठी नाहीत, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे बुधवारी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील संघटनाच चालवली. उद्धव ठाकरे देखील संघटन चालवत असताना ते अचानक मुख्यमंत्री झाले, अशी टिपण्णीही त्यांनी केली.
कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण भूमिकेवरून सरकारवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयात ९ सप्टेंबर रोजी स्थगिती मिळाली. तेंव्हापासून मराठा समाजातील प्रक्षोभ लक्षात घेऊन सुद्धा कोणताही निर्णय सरकार घेत नाही. हे सरकार या प्रश्नाचा अभ्यास करायला तयार नाही. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचे मातेरे केले आहे.राज्य सरकारने आर्थिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून सर्वसाधारण गटातून शैक्षणिक प्रवेश सुरू करणे हे धक्कादायक आहे. समाजाला न्याय देण्यासाठी ‘सुपर निमोरीकल’ पद्धतीचा वापर केला पाहिजे. मराठा समाजाने आमच्याकडे नेतृत्व दिल्यास आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला सळो की पळो करू,असा खरमरीत इशारा त्यांनी दिला.
प्रताप सरनाईक यांच्यावर सक्त वसुली संचानालयाने छापा टाकल्यावर यामागे भाजपचाच हात आहे, असा आरोप करीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मी सुद्धा १२० जणांची यादी अर्थमंत्रालायकडे देणार आहे. त्यातील किती जणांवर कारवाई होते बघू, असे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार पाटील म्हणाले,त्यांचा निर्णय उत्तम आहे. तुम्ही तात्काळ त्या संख्येत एक वाढवून १२१ जनांची यादी पाठवा. तुमचे हात कोणीही बांधून ठेवले नाहीत. धमकी द्यायचे दिवस गेले आहेत.आम्ही आमच्या मागे कफन बांधूनच आहोत. जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल, असा निर्वाळा त्यांनी दिला