येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यात सामान्यांना एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरं जावं लागत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट उभं ठाकलं आहे. आज पहाटे मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मराठवाड्यासह विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसासह गारपीट झाली आहे. तालुक्यातील हसनाबाद ,तळेगाव, सुरंगळी या भागात पहाटे 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आहे. त्यामुळे या भागातील पिकांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जातोय. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामळे जागोजागी गारांचा खच पडल्याचं दिसून आलंय.