सोलापूर : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी,सरपंच व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने राबवावी असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे.
यावर्षी सांस्कृतिक मंत्रालय देशभरात “हर घर तिरंगा” मोहिमेचे नेतृत्व करत आहे.सदर मोहीम आता राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव बनली आहे.यावर्षीच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त,”हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता:स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग” या टॅग लाईन अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ति मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मोहीम राबविण्याच्या सूचना प्राप्त आहेत.यासाठी गावागावात सदर मोहिमेची जनजागृती करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेची संकल्पना लोकसहभागातून उत्सव व नागरी एकतेच्या भावनेवर आधारित आहे. ज्यामध्ये स्वातंत्र्याचा सार ‘स्वच्छता व सुजलता’ या संकल्पनेशी जोडली गेली आहे.ग्रामीण भागात स्वच्छ पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता व आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी वाश (पाणी, स्वच्छता आणि आरोग्य ) ची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे.
या मोहिमेत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन अंतर्गत गावे/ ग्रामपंचायतमध्ये विविध उपक्रम राबवावयाचे आहेत.त्यामध्ये स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा,सार्वजनिक स्वच्छता मोहीम,वाश मालमत्तेची स्वच्छता,जनजागृती उपक्रम, जलसंवर्धन व दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक स्थळे इत्यादी प्रमुख पायाभूत सुविधांच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ करावा, यासाठी गट विकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दिनांक निहाय ही मोहीम पार पाडतील असेही प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले.
याबाबत मोहिमेसाठी हॅशटॅग "#HarGharSwachhta व #HarGharTiranga" आहे.या करिता मोहिमेच्या अनुषंगाने केंद्र शासन स्तरावरून साहित्य व डिझाईन तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.या मोहिमेत जिल्हा,तालुका,ग्रामपंचायत,गावागावांमधील लोकांचा सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शालेय विद्यार्थी,स्वयंसेवक तसेच सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावे
-उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) अमोल जाधव)