रेल्वे सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दिशेने मध्य रेल्वेने आणखी एक यश संपादन केले आहे. कल्याण इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये 50व्या लोकोमोटिव्ह (37335/WAP-7) वर ‘कवच’ प्रणाली यशस्वीरीत्या बसविण्यात आली. या लोकोमोटिव्हला आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या प्रसंगी मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीणा, प्रधान मुख्य विद्युत अभियंता, अनुप कुमार अग्रवाल आणि प्रधान मुख्य सिग्नल व दूरसंचार अभियंता, एम. एस. उप्पल उपस्थित होते.

‘कवच’ ही स्वदेशी विकसित स्वयंचलित रेल्वे संरक्षण (ATP) प्रणाली असून, तिचा उद्देश रेल्वे सुरक्षेला अधिक सक्षम बनविणे हा आहे. ही प्रणाली सिग्नल पासिंग ॲट डेंजर (SPAD), गतीमर्यादेचा भंग आणि अपघात/धडक होण्याची शक्यता कमी करते. स्टेशन उपकरणे व लोकोमोटिव्हवरील ऑन-बोर्ड युनिट्स यांच्यातील रेडिओ लिंकद्वारे सिग्नलिंगची माहिती आणि लोकोमोटिव्हचे स्थान यांची देवाणघेवाण ही प्रणाली वास्तव वेळेत करते. या माहितीच्या आधारे मुव्हमेंट अथॉरिटी लिमिट्स आणि गती मर्यादा पाळल्या जातात, ज्यामुळे रेल्वेचे संचालन अधिक सुरक्षित व कार्यक्षम होते.
भारतीय रेल्वे, सुरक्षा व स्वयंचलन वाढविण्यासाठी ‘कवच’ प्रणाली मिशन मोडमध्ये लागू करत आहे. रेल्वे बोर्डाने प्रथम टप्प्यात मध्य रेल्वेच्या 730 लोकोमोटिव्हवर ‘कवच’ बसविण्याची मंजुरी दिली असून, या कामासाठी चार उत्पादकांसोबत करार करण्यात आले आहे. – HBL (170), Kernex (278), Quadrant (276) आणि GG Tronics (6). मध्य रेल्वेच्या विविध लोको शेडमध्ये हे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, जेणेकरून लवकरच मध्य रेल्वेतील सर्व लोकोमोटिव्ह या अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीने सज्ज होतील.
50व्या लोकोमोटिव्हवर ‘कवच’ प्रणालीचे बसविणे हे मध्य रेल्वेच्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम रेल्वे संचालनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.