मुंबई : मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध महिलेचा गळा दाबून मंगळसूत्र लुटणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. डोंबिवलीत (Dombivli) विष्णू नगर पोलिसांनी ही कारवाई केली. महत्त्वाचं म्हणजे चोरट्याला पकडण्यासाठी त्याच्या आईचीच मदत झाली. आर्थिक विवंचनेतून चोरी केल्याची कबुली या चोरट्याने पोलिसांनी दिली. कानू वघारी असं या चोरट्याचं नावं असून त्या फूल आणि हार विक्रीचा व्यवसाय होता.
डोंबिवली पश्चिमेकडील देवी चौक परिसरात काल 85 वर्षीय महिला मॉर्निंग वॉक करत होती. याच दरम्यान काणू वघारी याने महिलेचा पाठलाग केला. काही अंतरावरच रहदारी नसल्याची संधी साधत या चोरट्याने महिलेचा गळा दाबून तिचं मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे चोरट्याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीचे ऑपरेशन झाल्याने त्याच्याजवळील सगळे पैसे खर्च झाले होते. त्याचा फूल आणि हार विक्रीचा व्यवसाय देखील बंद पडला होता. आर्थिक विवंचनेतून त्याने ही चोरी केल्याचं समोर आलं. त्याने याआधी चोरी केली असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
आईमुळेच चोराला बेड्या
वृद्ध महिलेचं मंगळसूत्र चोरल्यानंतर चोरट्याने या ठिकाणावरुन पळ काढला होता. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण या महिलेचा पाठलाग करत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरु केला. याच दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तरुण या परिसरात राहणारा असावा, असा संशय पोलिसांना होता.