सोलापूर, दि.9: लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे, शर्यती लावणे, प्रदर्शन भरविणे, प्राण्यांचे गट करुन कोणतेही काम पार पाडणे यास सक्त मनाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त ना.अ.सोनवणे यांनी आज दिली.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, लम्पी त्वचारोग गाय, म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जनावराच्या शरीरावर गोल आकाराच्या गाठी होतात. या रोगाचा प्रसार डास, माश्या, गोचीड इत्यादीमुळे होतो. बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास हा आजार होतो. मात्र जनावरांपासून मानवास हा आजार होत नाही. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावीत. या रोगामध्ये दोन तीन दिवस ताप राहतो. बाधित जनावराला भुक कमी लागते, दूध कमी देते, अशक्त होते ही लक्षणे दिसून येतात. उपचाराने जनावरी बरी होतात. सर्व बाधित जनावरांना लसीकरण करुन रोगाचा प्रसार थांबविता येतो.
जिल्ह्यामध्ये गोजातीय प्रजातीमधील इतर प्राणी पाळल्या जाणाऱ्या ठिकाणापासून कोणत्याही ठिकाणी ने-आणण्यास मनाई केली आहे. बाधित झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली वैरण, गवत, अन्य साहित्य अशा प्राण्यांचे शव, कातडी नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.