जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांनी प्रत्येकी पाच झेंडे बचत गटा कडून खरेदी करावेत
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रध्वज विक्रीसाठी बचत गटाचा स्टॉल लवकरच लागणार
जिल्ह्याला साडेसात लाख राष्ट्रध्वज 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत लावण्याचे उद्दिष्ट
घर व कार्यालयावर राष्ट्र ध्वज लावताना ध्वज संहिताचे तंतोतंत – पालन झाले पाहिजे
सोलापूर :- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “हर घर झेंडा” ही मोहीम राबवली जात आहे. सोलापूर जिल्ह्याला या मोहिमेअंतर्गत साडेसात लाख तिरंगा राष्ट्रध्वज लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून जिल्ह्यातील प्रत्येक घर, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांवर हे झेंडे लावण्यात येणार आहेत. तरी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय प्रमुख यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या स्तरावर सूक्ष्म नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर झेंडा" च्या अनुषंगाने नियोजन आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री शंभरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पोलीस उपायुक्त दीपाली घाटे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. सांगळे, नगरपालिका प्रशासन चे जिल्हा प्रशासन अधिकारी एन. के. पाटील, राज्य उत्पादन शुल्क चे अधिक्षक गणेश धार्मिक, उमेदच्या जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी माडवळे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बचत गटांना प्राधान्य
हर घर झेंडा अंतर्गत जिल्ह्याला साडेसात लाख राष्ट्रध्वज लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यात झेंड्याची उपलब्धता होण्यासाठी व्हेंडरवरच विसंबून न राहता जिल्ह्यातील बचत गटांना राष्ट्रध्वज निर्मितीचे काम देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. बचत गटांना झेंडी निर्मितीचे ऑर्डर देऊन ते विक्री करण्यासाठी शासकीय कार्यालयात स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावेत. असा स्टॉल जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी पाच झेंडे खरेदी करावेत, तर अधिकाऱ्यांनी देणगी द्यावी
जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय निमशासकीय कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या स्तरावर अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मीटिंग घेऊन सर्व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी पाच राष्ट्रध्वज खरेदी करण्याबाबत सूचित करून अधिकाऱ्यांनी देणगीच्या स्वरूपात झेंड्यासाठी रक्कम घ्यावी व आपल्या विभागाची स्वतंत्र ऑर्डर बचत गटांना त्यांच्या स्तरावरून द्याव्यात व विहित वेळेत झेंडे उपलब्ध करून ते सर्व कर्मचाऱ्यांना वितरीत करून त्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या घरासह अन्य आपल्या शेजारी अथवा नातेवाईकांना झेंडे उपलब्ध करून द्यावेत.
ध्वज संहिताचे पालन व्हावे
दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात प्रत्येक घर शासकीय निमशासकीय कार्यालये, खाजगी अस्थापना, स्वयंसेवी संस्था कार्यालयावर तिरंगा हा राष्ट्रध्वज लावला जाणार आहे. तरी राष्ट्रध्वज लावत असताना ध्वज संहिताचे तंतोतंत पालन झाले पाहिजे यासाठी प्रत्येकाने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे.तसेच सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर नागरिकांची जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.
सेस फंडातून निधीची उपलब्धता होणार नाही
जिल्हा परिषद जिल्हा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागात चार लाख 40 हजार झेंडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने ग्रामीण स्तरावर सूक्ष्म नियोजन सुरू आहे परंतु राष्ट्रध्वज खरेदीसाठी सेस फंडातून दहा ते पंधरा लाख निधीची उपलब्धता होऊ शकते परंतु उद्दिष्ट मोठे असल्याने हा निधी अत्यंत कमी आहे तरी जिल्हा परिषद प्रशासन स्तरावर सुक्षम नियोजन सुरू असून ग्रामीण भागाच्या प्रत्येक घरावर झेंडा लावण्याचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. तसेच ग्रामीण भागाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले.
राष्ट्रध्वज लावण्याबाबत जनजागृती
दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीत जिल्ह्यात सर्व ठिकाणी राष्ट्र ध्वज लावण्यासाठी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी पंचायत व ग्राम स्तरावरून ही प्रबोधनात्मक मोहीम राबवली जाईल. तसेच अन्य शासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरून ही राष्ट्रध्वज लावण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे व हर घर झेंडा ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगर पालिका चे मुख्य अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व उपनिबंधक व अन्य संबंधित जिल्हा व तालुका प्रमुख दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.