सोलापूर, दि. 1 (जिमाका):-जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्रामार्फत विविध संस्थांना कौशल्य आधारित अभ्यासक्रम चालवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्या सर्व संस्थांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना अंतर्गत उमेदवारांना कौशल्य आधारित उत्कृष्ट प्रशिक्षण द्यावे व त्या उमेदवारांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विहित वेळेत नोकरी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने कौशल्य विकास अंतर्गत करार करण्यासाठी 15 दिवसात प्रस्ताव पाठवावा
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या विविध योजनांच्या आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक योगेश वाघ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कौशल्य विकास समन्वयक प्रशांत चोरमले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. बी. काटकर, सहाय्यक कामगार आयुक्त एस. एम. गायकवाड, उद्योजक अमित जैन, रविकिरण स्किल ट्रेनिंग चे सचिन लवंगी, सोलापूर महापालिकेचे कौशल्य विकासचे गणेश कोळी, समीर मुलांनी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की, कौशल्याचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात सुरू केलेल्या केंद्रामध्ये विविध कौशल्य आधारित अभ्यासक्रम व्यवस्थितपणे चालू ठेवावेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षक नियुक्त करावेत. तसेच प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांना विहित वेळेत 100 टक्के रोजगार(नोकरी) मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. त्याप्रमाणेच ज्या उमेदवारांचे स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल त्या उमेदवारांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करावे व प्रशिक्षित उमेदवारांना मिळालेल्या रोजगाराच्या नोंदी कौशल्य विकासने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून 5943 लाभार्थ्यांना व्याज परतव्याचा लाभ झाला
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळा च्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत मागील चार वर्षात सोलापूर जिल्ह्यातील 6 हजार 509 लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे बँकांनी मंजूर केलेली दिसून येत आहेत, त्यापैकी 5 हजार 943 प्रकरणांमध्ये महामंडळाकडून व्याज परतावा मंजूर केलेला असून त्यासाठी 46 कोटी 69 लाख रुपये संबंधित लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. तरी जिल्ह्यात या महामंडळ अंतर्गत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून मराठा समाजातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मोठा वाव असून त्यासाठी महामंडळाचे जिल्हा समन्वयकांनी याबाबत स्वतंत्र बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करावी. त्यापूर्वी महामंडळ अंतर्गत बँकांनी रिजेक्ट केलेल्या किमान 500 प्रकरणाचा अभ्यास करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
उद्योजकाच्या मागणीनुसार कौशल्य विकास अंतर्गत डिजिटल मार्केटिंग चा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत कौशल्य आधारित जे अभ्यासक्रम सुरू आहेत, त्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवारांना मिळवून त्यांना नोकरी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास केंद्रासोबत करार करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने एक स्वतंत्र प्रस्ताव पुढील पंधरा दिवसात सादर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. त्याप्रमाणेच कौशल्य विकास अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षण संस्थांमध्ये डिजिटल मार्केटिंग चा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या सचिवाशी चर्चा करून जिल्हास्तरावरून प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार असून हा डिजिटल मार्केटिंग चा अभ्यासक्रम सुरू करून उद्योजकांना आवश्यक असलेले त्यातील तज्ञ उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मंडळाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे
प्रारंभी जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री नलावडे यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती बैठकीत दिली. यामध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ कडील योजना, मॉडल करियर सेंटर आदीची माहिती दिली.