मंगळवेढा : केद्रांत राज्यात सलग दहा वर्षे सत्ता असूनही सोलापूर लोकसभेचा उमेदवार दर निवडणुकीला का बदलावा लागतो असा सवाल उमेदवार काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी तालुक्यातील मरवडे येथे बोलताना व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी आज बोराळे मरवडे हुलजंती गावाच्या दौऱ्यात मरवडे येथे त्या बोलत होत्या. शिंदे म्हणाल्या की देशातील अर्थकारण हे शेतकऱ्यांच्या जीवावर असून शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांचे अस्तित्व संपण्याची काम सत्ताधाऱ्याकडून सुरू आहे, त्यानी महागाई वाढवली, दुधाचा प्रश्न मार्गी लावला नाही, पीक विम्याचे पैसे दिले नाहीत, गुजरातचा कांदा परदेशात पाठवत महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यात बंदी का? असा सवाल करून अंबानी अदानीसह पाच ठेकेदाराचे हित पाहण्याचे काम सुरू आहे.
पुढील दहा वर्षात काय काम करणार यावर न बोलता जात, धर्म, पात, हे मुद्दे काढून निवडणुकीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही मतदारानी या निवडणुकीची एक लढाई माझ्यासाठी करावी पुढची लढाई मी तुमच्यासाठी लढेन असे सांगून मला संधी मिळाल्यास लोकसभेत पहिला आवाज हा शेतकऱ्याचा असेल.
पांडूरंग चौगुले म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झाली.निवडणूकीच्या तोंडावर मंगळवेढा उपसा सिंचन योजना माण नदीवरील बॅरेज वगळून पाणी मंजुरी गाजर दाखवले. चंद्रशेखर कौडूभैरी म्हणाले,दहा वर्षात दोन खासदारांनी लोकसभेत एकही प्रश्न मारून तडीस नेला नाही. यंदाच्या निवडणुकीत चांगला लोकप्रतिनिधी लोकसभेत जाणे आवश्यक आहे.