महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी याचा निकाल लागणार आहे तर 31 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बऱ्याच वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून राज्यातील महायुती स्वतंत्रपणे विविध पक्षांबरोबर तर कुठे स्थानिक आघाडी करून लढवीत आहेत. भाजप, एकनाथ शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकावर ठरवून चिखल फेक करत आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे विरोधकांचा प्रचार कुठे दिसत नसून निवडणूक पूर्वी एकमेकांवर आरोप करायचे आणि पुन्हा सर्व नगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन आपले महायुती चे स्थान बळकट करायचे असा इरादा या तीनही पक्षाचा असल्याचे दिसून येते.
सोलापूर जिल्ह्याचा विचार करता 12 नगरपालिकांमध्ये चार लाख 45 हजार मतदार आहेत. त्या – त्या नगरपालिकेतील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून इथल्या मतदारांना उल्लू बनविण्याचा सध्या प्रचार सुरू आहे. कोण कोणाच्या विरोधात लढतोय हे नेत्यांना देखील कळत नाही त्यामुळे मतदारांची यामध्ये चांगलीच फसगत होणार आहे. निवडून येणारा तो आपलाच अशी रणनीती महायुतीने अवलंबिली आहे. त्यामुळे या नगरपालिकांमध्ये महायुतीच कडेच जास्तीत जास्त नगरपालिका राहतील असे दिसते. मोहोळ, अक्कलकोट पंढरपूर या ठिकाणी शिळ्या कडीला ऊत आल्याप्रमाणे 20 – 20 वर्षांपूर्वीचे मुद्दे उकरून काढले जात आहे. नागरिकांच्या महत्त्वाच्या मुद्द्याला बगल देऊन हा मतदारांना उल्लू बनविण्याचाच प्रचार दिसतो दिसतो.

