नागपूर : गडचिरोली येथील जंगलात सी – 60 जनानांनी 3 जहाल नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन केले आहे. ज्या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, त्यांनी अनेकांचा जीव घेतला होता. महाराष्ट्र दिना निमित्ताने आज नागपूर येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
जंगलात तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली : पेरिमिली आणि अहेरी दलम हे माने राजाराम ते पेरिमिली सशस्त्र चौकी दरम्यान केडमारा येथील जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगल परिसरात शोध मोहीम राबवण्यासाठी प्राणहिता येथून दोन सी – 60 पथकांना रवाना केले. शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार सुरु केला. सी – 60 पथकाने देखील त्यांना प्रत्युतर दिले.
तीन नक्षलवाद्यांचा खात्मा : गोळीबारानंतर पथकाने परिसरात शोध मोहिम राबवली. शोधमोहिमेत त्यांना त्या भागात शस्त्रे आणि इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर काही अंतरावर तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी याचा एक मृतदेह आणि इतर दोन मृतदेह पेरिमिली दलमच्या वासू आणि अहेरी दलमच्या श्रीकांत यांचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की, वासू याला 2023 मध्ये पेरिमिली एलओएसच्या डीव्हीसीएम पदावर पदोन्नती देण्यात आली होती तर श्रीकांत यावा उपपदावर पदोन्नती देण्यात आली होती. अहेरी LOS चे कमांडर याची पडताळणी करत आहेत.
साईनाथ नरोटेच्या हत्येचा आरोपी : बिटलू मडावी हा या वर्षी 9 मार्च रोजी विद्यार्थी साईनाथ नरोटे याच्या हत्येसह फेब्रुवारी / मार्च 2023 मध्ये विसामुंडी आणि आलेंगा येथे रस्ते बांधकाम उपकरणांची जाळपोळ करण्याच्या दोन घटनांमध्ये मुख्य आरोपी होता.