येस न्युज नेटवर्क : आयसीसी टी20 2022 विश्वचषक स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया येथे पार पडणार आहे. दरम्यान आगामी विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी सुरु केली असून काही देशांनी आपले संघही जाहीर केले आहेत. दरम्यान बीसीसीआयकडून भारती संघाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कप खेळू शकला नाही. पण आता तो देखील दुखापतीतून सावरत लवकरच संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या संघातही तो असणार अशी माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसांत म्हणजेच 15 सप्टेंबरपर्यंत टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
आता लक्ष्य टी20 विश्वचषक
भारतीय संघ आशिया कप 2022 मध्ये खास कामगिरी करु शकला नाही. आशिया कपमधील भारताची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकत सर्वात आधी सुपर 4 मध्ये स्थान मिळवले. पण सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला. भारताने अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला. दरम्यान आता मात्र टीम इंडिया 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. याआधी भारच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत भारत विविध खेळाडूंना संधी देऊन विश्वचषकाची तयारी करेल.